Indrajit bhalerao biography examples
डायरीची पाने:संमेलने : तेव्हाची नि आताची
इंद्रजित भालेराव11 महिन्यांपूर्वी
आपल्या अवतीभोवतीच्या अनेक गोष्टी वेगाने बदलत आहेत. कालच्या गोष्टी आज जराही दिसत नाहीत अन् आजच्या गोष्ट उद्या तशाच असत नाहीत. सर्वच क्षेत्रांत होत असलेल्या अशा बदलांच्या निमित्ताने, जुन्या - नव्याची तुलना करणारे, या दोन्हींतील चांगले-वाईट पारखतानाच त्यांच्यात समतोल साधणारे अन् सगळी झापडं बाजूला सारून निर्मळ मनाने सभोवतालाचा वेध घेणारे हे नवे पाक्षिक सदर.
गेल्या चाळीस वर्षांपासून मी साहित्य संमेलन पाहत आलेलो आहे. मी ज्या महाविद्यालयात शिकायला होतो त्या वसमतच्या बहिर्जी स्मारक महाविद्यालयात १९८१ मध्ये झालेलं मराठवाडा साहित्य संमेलन हे मी पाहिलेलं माझ्या आयुष्यातलं पहिलं संमेलन होतं. १९८३ मध्ये अंबाजोगाईला व्यंकटेश माडगूळकर यांच्या अध्यक्षतेखाली जे साहित्य संमेलन झालं, ते मी पाहिलेलं पहिलं अ. भा. मराठी साहित्य संमेलन होतं. त्याच्या अर्धशतक आधी ही संमेलनं व्हायला सुरुवात झालेली होती. या संमेलनांचं स्वरूप बदलत गेलेलं आहे. काळानुरूप गोष्टी बदलतातच. पण, हे बदल चांगले व्हावेत असं अपेक्षित असतं. ते भलतीकडेच होत असतील तर ती चिंतेची गोष्ट असते. उगाच स्मृतिरंजन म्हणून जुनी संमेलनं चांगली होती, असं म्हणण्यात अर्थ नसतो. पण, जुन्या संमेलनातलं काही चांगलं हरवत चाललं असेल तर त्याची काळजीही करायला हवी.
एकेकाळी संमेलनाचा आवाका सर्वार्थानं मर्यादित होता. त्याला खर्चही फारसा लागत नसे आणि लोकही आजच्यासारखे प्रचंड प्रमाणात जमा होत नसत. पण, तिथं होणारी चर्चा फार महत्त्वाची असायची. समाजाचा, साहित्याचा गंभीरपणे विचार करणारे सर्व महत्त्वाचे लोक तिथं एकत्रित यायचे. पण, हळूहळू संमेलनाचं स्वरूप बदलत गेलं तसतसा त्याचा खर्चही वाढत गेला. संमेलनाला शासनानं मदत द्यायला सुरुवात केली. संमेलन लोकांचं, सरकार लोकांचं त्यामुळे अशी मदत मिळणं योग्यच होतं. पण, सगळेच लोक अशी लोकशाही मानणारे नसतात. आम्ही पैसे देतो म्हणजे आमच्याही अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत, असं सरकारातल्या लोकांना वाटू लागलं. आणि शासनाचा हस्तक्षेप संमेलनात व्हायला लागला. पुढं ही मदत वाढत गेली आणि नेते, पुढारी यांचा सहभागही वाढत गेला.
संमेलनाला इतक्या मोठ्या प्रमाणात लोक येतात म्हणजे त्यांना खिळवून ठेवणारे कार्यक्रम हवेत म्हणून संगीत आणि चित्रपटातल्या लोकांना संयोजकांनी त्यांना बोलवायला सुरुवात केली. त्यामुळे पुढं असं होऊ लागलं की, जे रंजक कार्यक्रम आहेत तिथं गर्दी होऊ लागली आणि जिथं गांभीर्यानं चर्चा होतात तिथला मंडप मात्र रिकामा राहू लागला. त्यामुळे संमेलन आपल्या उद्देशापासून दूर जाऊ लागलं. परळी साहित्य संमेलनात एका मोठ्या लेखकाची प्रकट मुलाखत सुरू होती. अर्धा मंडप भरलेला होता. पण, शेजारच्या मंडपात लोककलांचा कार्यक्रम सुरू झाला. ढोलकी कडाडली अन् लेखकासमोरचे सगळे प्रेक्षक उठून तिकडच्या मंडपात पळाले. हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं आहे.
पूर्वी संमेलनाला गर्दी होत नव्हती. मोजकेच प्रकाशक आपली पुस्तकांची दुकानं घेऊन येत आणि लोकांना पुस्तकं मिळत नसल्यामुळे इथून बऱ्यापैकी पुस्तकांची खरेदीही होत असे. १९९५ मध्ये नारायण सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या परभणीला झालेल्या संमेलनात पुस्तकांची विक्रमी विक्री झाली होती. कोरोनाकाळाच्या आधी उस्मानाबादला झालेल्या संमेलनातही चांगली पुस्तक विक्री झाली. पण, पुढच्या तीन-चार संमेलनात ती घटत गेली. उस्मानाबाद संमेलन हे अनेक अर्थानं आदर्श संमेलन झालं. कमीत कमी पैशात आणि कमीत कमी अन्य हस्तक्षेपात झालेलं हे संमेलन सर्वार्थाने उत्तम संमेलन होतं.
संमेलनाचा मूळ उद्देश साहित्यकेंद्रीच असला पाहिजे. त्यात मग ग्रंथ प्रदर्शनातून विक्री होण्याच्या दृष्टीनं काय करता येईल, महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून काय करता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नव्यानं लिहिणाऱ्यांना व्यासपीठ मिळावं आणि जुन्यांचे प्रगल्भ विचार नव्यांपर्यंत पोहोचावेत या दृष्टीनं काही घडामोडी व्हायला हव्यात. करमणूकप्रधान कार्यक्रम नाही ठेवले तरी चालतात. लोक कमी आले तरी चालतात. संमेलनाचं स्वरूप मर्यादित झालं तरी चालतं. पण, तिथं होणाऱ्या गोष्टी गांभीर्यानंच व्हाव्यात. गंभीर कार्यक्रमांना अलीकडच्या काळात लोक कमी प्रतिसाद देतात म्हणून करमणूकप्रधान कार्यक्रमाचा भरणा करून संमेलन मूळ उद्देशापासून दूर नेण्यात काहीही अर्थ नाही.
संमेलन आणि राजकारणी हा वाद कायमच ठरलेला असतो. खरं तर ही वाद करण्यासारखी गोष्ट नाही. पण, आपणाला भव्य संमेलन हवे असते, म्हणून स्वागताध्यक्ष एखादा नेता हवा असतो, जो निधी उभा करू शकेल. कुठल्याही नेत्याला आपण एवढा पैसा लावत असू तर त्यातून आपलाही काही फायदा व्हावा, असं वाटतच असणार. त्या दृष्टीनं त्यांचाही काही आग्रह होत असणार. खूप लोक जमा व्हावेत आणि संमेलनासोबत आपलीही प्रसिद्धी व्हावी, असं नेत्यांना वाटणं स्वाभाविक आहे. त्यात काहीही वावगं नाही. त्यामुळे लोक कसे जमा होतील, या दृष्टीनं संमेलनाचं नियोजन व्हावं असंच त्यांना वाटत असणार. त्या दृष्टीनं करमणूकप्रधान कार्यक्रमांचा भरणा होत असणार. मग त्यासाठी नट-नट्या, नाट्यकलावंत, गायनाचे कार्यक्रम यांचा भरणा होत असतो. खरं तर केवळ चांगल्या कवितांच्या गायनाचे कार्यक्रम संमेलनात व्हायला हवेत. शंकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १९८५ मध्ये नांदेडला झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात ‘खान्देशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा’ हा बहिणाबाई चौधरींच्या कवितांवर आधारित कार्यक्रम ठेवला होता. त्यातून बहिणाबाई पुन्हा एकदा मराठी माणसासमोर व्यापक स्वरूपात आल्या. असे प्रयोग जाणूनबुजून व्हायला हवे होते. रंजनप्रधान कार्यक्रमांना तिथं स्थान असायला नको.
संमेलनातूनच आतापर्यंत मराठी भाषेच्या अनेक चळवळींचा जन्म झाला. भाषेचा आणि साहित्याचा विकास आणि विस्तार व्हावा यासाठी संमेलन कार्यरत असावं. पण, नंतर सामाजिक चळवळींनीही संमेलनात प्रवेश करायला सुरुवात केली. संमेलनावर मोर्चे येऊ लागले आणि संमेलनं बंद पाडण्याचे प्रयोगही होऊ लागले. इथं आल्यावर मोठी प्रसिद्धी मिळते हे माहीत झाल्यामुळे लोक इकडं धाव घेऊ लागले. आपण संमेलनाला भव्य रूप देण्याच्या नादात काय काय प्रश्न निर्माण करून ठेवलेत हे संयोजकांच्या किंवा महामंडळाच्याही लक्षात येईनासे झाले. महामंडळाचे लोकही गांगरून गेल्यासारखे झाले. संमेलन भव्य व्हावे, असे तर कुणालाही वाटेल. पण, त्यासोबत काही नको ते येत असेल, तर ते टाळण्यासाठी भव्यताही टाळली पाहिजे. म्हणून संमेलन आटोपशीर होणे केव्हाही चांगले. अशा संमेलनातूनच काही गोष्टी गांभीर्यानं पुढं येतील. नाहीतर सारीच करमणूक होईल. सगळे करमणुकीच्याच नादाला लागले तर आयुष्याचा गांभीर्यानं विचार कोण करील? साहित्याने कायमच आयुष्याचा गांभीर्यानं विचार करायला हवा. साहित्यातून तितक्याच गांभीर्यानं समाजाचे प्रश्न आले तर त्याचं स्वागतही व्हायला हवं. पण, आरडाओरडा करून समाजाचे प्रश्न मांडण्याचं साहित्य संमेलन हे ठिकाण नाही हे आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे.
(संपर्कः inbhalerao @)
.